Skip to main content

हिरण्यदुर्ग - संजय सोनवणी

 



पुस्तकाचे नाव : हिरण्यदुर्ग.
साहित्य प्रकार : अद्भुतरम्य कादंबरी.
लेखक : संजय सोनवणी.
मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी.
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे.
पृष्ठं : ३५२
किंमत : ३५० रु.

अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार तसा मराठी साहित्याला नवा नाहीये. पण दुर्दैवाने मराठी साहित्यात या कादंबरी प्रकारात फारसे काम लेखकांकडून झालेले नाही. मुळात कथानक गुंफण्याचं विलक्षण कसब असणारा लेखकच या अद्भुताच्या विश्वात प्रवेश करायला धजावतो. अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार मराठीत सुरु कसा झाला हा एक खरोखर उत्सुकतेचा विषय आहे. गो.ना. दातार यांनी रेनॉल्ड्स या पाश्चात्य लेखकाच्या कादंबर्‍यांची भारतीय रुपांतरे मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे व त्या कादंबर्‍या लोकप्रिय झाल्यावर अद्भुतरम्य कादंबर्‍या अनेक मराठी लेखक लिहू लागले. पण त्या सर्व कादंबर्‍यांचे सांगाडे विदेशी लेखकांचे असत. अगदी अलिकडे काही दशकांपूर्वी 'मर्मभेद'कार म्हणून गौरविले गेलेल्या शशी भागवतांच्या या कादंबरीतले अद्भुत ऐयार त्याच्याही आधी दोन दशकांपूर्वीच देवकीनंदन खत्रींच्या 'चंद्रकांता' या हिंदी कादंबरीत आले होते. 'चंद्रकांता'त ऐयार कुठून आले हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. बाळसे धरु लागलेला अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्य प्रकार आता संपुष्टात येतो की काय असे चित्र असतानाच आणि २०१४ वर्ष संपत असताना, किंबहुना गेल्या कित्येक दशकांत प्रकाशित झालेल्या ढीगभर पुस्तकांत "हिरण्यदुर्ग" खरोखर सोन्याच्या तेजस्वितेने तळपणारे पुस्तक आहे.

"हिरण्यदुर्ग" ही एक अद्भुतरम्य कादंबरी आहेच. पण अद्भुतरम्य कादंबरी या साहित्य प्रकारातली मानदंड ठरणारी अशी ही कादंबरी आहे. का आणि कसे ते थोडक्यात सांगतो. आतापर्यंत आपण वाचत आलेल्या कित्येक अद्भुतरम्य कादंबर्‍या भारतीय रुपातल्या असल्या तरी त्या सर्व कादंबर्‍यांचे कथासूत्र बव्हंशी विदेशी व क्वचित इतर भाषेंतील कादंबर्‍यांवरुन घेतलेले होते. अगदी मुळापासून कथासूत्र अस्सल मराठी भाषेतील असलेली अद्भुतरम्य कादंबरी आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही. अद्भुतरम्य कथानकाची निर्मिती करण्यासाठी विलक्षण प्रतिभा लागते. मराठी वाचकांना थरार कथा आणि रहस्यकथा वेगवेगळ्या आहेत याची जाणीव करुन देणारे व थरारकथांचा सम्राट म्हणून ज्यांनी अतिशय तरुण वयात नाव कमावले ते आजचे आघाडीचे व लोकप्रिय लेखक श्री. संजय सोनवणी वाचकांना परिचित आहेतच. या लेखकाने आतापर्यंत अनेक साहित्यप्रकार आव्हान म्हणून स्वीकारले व प्रमाणाबाहेर यशस्वीपणे योगदान देऊन हाडाचा लेखक काय काय करु शकतो याचा जणू एक आदर्शच त्यांनी निर्माण केला आहे. शेकडो लेख आणि शंभराच्या आसपास पुस्तके लिहून एक प्रकारची स्थितप्रज्ञता आल्यावर संजय सोनवणी यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाने अद्भुतरम्य कादंबरी लिहिणे हे मराठी वाचकांचे एक प्रकारचे भाग्यच आहे असे मी समजतो. यापुढेही अद्भुतरम्य कादंबर्‍या अनेक लिहिल्या जातील. तरीही कथानकाचा सांगाडा व जडण घडण संपूर्णपणे मराठी असलेली मराठीतील पहिली अद्भुतरम्य कादंबरी म्हणून "हिरण्यदुर्ग" कायमच ओळखली जाईल. या प्रशंसेसाठी लेखक श्री. संजय सोनवणी खरोखर पात्र आहेत.

सातवाहनांचा गौरवशाली काळ हा खरे तर महाराष्ट्राच्या व आपल्या देशाच्या इतिहासाचाही मानदंड असायला हवा होता. पण यावर दुर्दैवाने आपल्या संशोधक वा इतिहासकारांकडून म्हणावी तशी भरीव कामगिरी झाली नाही. स्वतः लेखक संजय सोनवणी हे इतिहास संशोधनही करत असल्याने सातवाहनांच्या काळाची पार्श्वभूमी 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीसाठी वापरुन त्यांनी एक प्रकारे वाचकांसाठी महाराष्ट्राच्या सातवाहन राजांच्या वैभवशाली इतिहासाची कवाडेच जणू उघडून दिली आहेत.

हिरण्यदुर्गाच्या गाभार्‍यात आता डोकावून पाहूयात. 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीत असे काय आहे की ज्यासाठी वाचक पुस्तकाला चिकटून राहतो?. अद्भुत, वीर, रौद्र, बीभत्स, भय, रोमांच, थरार, शौर्य, प्रेम, वासना, थरकाप, हिडिस, घृणा, प्रेरणा, चेतना, आशा, निराशा, जय, पराजय, सुष्ट, दुष्ट, हिंसा, अहिंसा, संहार, प्रतिकार, अशा कित्येक प्रकारच्या मनोभावनांचा परिचय वाचकांना "हिरण्यदुर्ग" ही अद्भुतरम्य कादंबरी करुन देते. कादंबरीचे नाव "हिरण्यदुर्ग" असल्यामुळे हिरण्यदुर्ग या कादंबरीत केंद्रस्थानी असणार हे उघड असल्याने या कादंबरीची सुरुवात होते ती सिंहभद्र आणि केतुमाल या दोन आगंतुक प्रवाशांबरोबर. हे दोन्ही प्रवासी वाट चुकून सूर्य मावळल्यानंतर हिरण्यदुर्गाच्या परिसरात येतात आणि त्यांचे खूप आदरपूर्वक स्वागत होते. प्रवासाने थकलेले हे दोघे प्रवासी हिरण्यदुर्गाची श्रीमंती पहात सुग्रास भोजन करुन मदनमंजिर्‍यांच्या गोड सहवासाने रात्री गाढ झोपी जातात. सकाळी दोघे जागे होतात आणि पूर्णपणे हादरतात ते उध्वस्त भिंती... गच्च झुडपांचे रान...  ढासळलेले बुरुज ...असा दुर्ग पाहून. काय असते हिरण्यदुर्गाचे हे भयंकर रहस्य?

पुढे हिरण्यदुर्गाच्या कक्षेतून बाहेर पडून सिंहभद्र आणि केतुमाल हे प्रवास करु लागतात. वाटेत एक गूढ जटाधारी भेटून त्यांना आसरा देतो. त्याच्या साहाय्याने एका गुप्त गुहेच्या मार्गाने दुसर्‍या बाजूने ते  दोघे बाहेर येतात. धनगरांकडुन मिळालेली धक्कादायक वागणूक वाचकांना आश्चर्याच्या गर्तेत ढकलते. खुद्द सिंहभद्र देखील त्या वागणुकीने चक्रावतो. जसजसा त्या निष्पाप व मोकळ्या मनाच्या धनगरांच्या सहवासात राहून सिंहभद्र गोष्टी ऐकत जातो तसतसा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. स्वतःच्या आजच्या अस्तित्त्वाची पाळेमुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या भयंकर संग्रामात दडलेली आहेत हे जाणून स्वतः सिंहभद्र आणि पर्यायाने केतुमालही थरकापतात.

पुढे पुलोम्याच्या सर्व शक्ती जागृत होतात आणि तो प्रकटतो. पुलोमा अवतीर्ण झालाय आणि सिंहभद्र अजूनही स्वतःच्या अस्तित्वाची पाळेमुळे शोधतो आहे. अशा विपरीत अवस्थेत या भयंकर रणसंग्रामाला सुरुवात होते. असंख्य लोहपीसांचा वर्षाव करणारा लोहपक्षी, त्याच्याशी लढणारा सिंहभद्राच्या आज्ञेतील त्रिशूळ. सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच त्याला नष्ट करण्याच्या हेतूने अवाढव्य पर्वतच्या पर्वत उध्वस्त करणारा पुलोमा. पाताळगंगेचे रहस्य, विनाशकारी परिस्थितीत तेर नगरीतील सर्पांच्या राजाकडे सुरक्षित ठेवलेले गूढ आणि रहस्यमयी बाड. ते बाड मिळून सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच पुलोम्याने नागांच्या राणीला आपल्या सापळ्यात अडकवून बाड नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न. बाडाच्या रक्षणासाठी झटणार्‍या शक्तीश्री महाराजांना आलेले अपयश. अशातच गोंधळलेल्या सिंहभद्राच्या आयुष्यात देवसेनेचा अचानक झालेला प्रवेश. पुलोम्याला देवसेनेचा पडलेला मोह. अशा अनेक धक्क्यांमागून धक्के देणारे हे अद्भुतरम्य कथानक वाचकाची उत्कंठा शेवटच्या पानापर्यंत ताणून धरण्यात यशस्वी ठरते.

सिंहभद्र कोण असतो? देवसेना कोण असते? पुलोम्या कसा अवतरतो? सिंहभद्राला जागे करु शकणारे बाड नष्ट होते का? त्यात काय असते? लोहपक्ष्याशी त्रिशूळ कसा लढतो? त्रिशूळ सिंहभद्राच्याच आज्ञेत का असतो? हिरण्यदुर्गाचे रहस्य काय असते? हिरण्यदुर्गाच्या पोटात असे काय रहस्य दडले असते की सर्वशक्तीमान खुद्द पुलोम्याही त्यात प्रवेश करु शकत नसतो? सिंहभद्राला त्याच्या शक्तींचे भान येते का? युद्धात कोण जिंकतो? पुलोम्या की सिंहभद्र? तेर नगरीतील सर्प सातवाहनांच्या चरणी वाहिलेली आपली जन्मोजन्मीची निष्ठा पाळतात का? पाताळगंगेचे रहस्य काय असते?  सातवाहनांच्या राजांची सिंहभद्र आणि पुलोम्या या संघर्षात काय भूमिका असते? सातवाहन ते बाड एवढे का जपत असतात? शक्तिश्री राजाची कन्या देवसेनेचे एक रहस्य काय असते? कुबड्या कोण असतो? त्याचे रहस्यमय वागणे शेवटी कसे उकलते? कोण असतो हिरण्यदुर्गाचा खरा स्वामी? धर्मपाल आणि महाधम्मरक्ख (बौद्ध भिक्खू) सिंहभद्राला कोणती मदत करतात ? शक्तीश्री महाराजांचे एकनिष्ठ सेवक आमोदक आणि गंगाधर बाडासाठी शेवटपर्यंत कसे झुंझतात? हिरण्यदुर्गाच्या परिसराचे रहस्य उकलते का? मरुगण नेमके कोण असतात? ते कोठून आलेले असतात? त्यांचा सिंहभद्राशी काय संबंध असतो? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पानोपानी उत्कंठा ताणून धरणार्‍या "हिरण्यदुर्ग" या अद्भुतरम्य कादंबरीतून मिळतात.

अद्भुतरम्य कादंबरी मध्ये धक्का तंत्र प्रभावीपणे वापरणे हे अतिशय मोठे आव्हान असते. आणि त्यात हिरण्यदुर्ग या कादंबरीचे लेखक संजय सोनवणी हे पूर्णत: किंबहुना जास्तच यशस्वी झालेले आहेत. ही कादंबरी वाचताना वाचकाला पानोपानी धक्के बसत जातात. जेव्हा वाचक भानावर येतो तेव्हा लक्षात येते की आपली कादंबरी वाचून पूर्ण झालेली आहे. हेच हिरण्यदुर्ग चे अद्भुत यश आहे. वाचकाला अजून काय हवे असते? हिरण्यदुर्ग वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाच्या मनात उरतो तो एका थरारक व रोमांचकारी प्रवासाचा आनंद. सातवाहन काळातील तेर व प्रतिष्ठान नगरी, सातपुड्याच्या अजस्त्र पर्वतरांगा....निबीड अरण्ये....हिरण्यदुर्गाच्या या अद्भुत विश्वात वाचकाला पुन्हा पुन्हा फिरायला प्रेरित करेन. हिरण्यदुर्ग या कादंबरीमुळे भविष्यात अनेक लेखकांना स्वतंत्रपणे अद्भुतरम्य कादंबरी मराठीतून लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही आणि या अद्भुतरम्य कादंबरीची दखल मराठी साहित्यात मैलाचा दगड म्हणून कायमच घेतली जाईल. 'हिरण्यदुर्ग' चा हा अत्यंत थरारक व रोमांचकारी संघर्षाचा प्रवास वाचकांना नक्कीच आवडेल...

Comments

Popular posts from this blog

मेलुहाचे मृत्युंजय - अमिश त्रिपाठी (अनुवाद : डॉ. मीना संभू-शेटे)

  'मेलुहाचे मृत्युंजय'  हा 'द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा' या अमिश त्रिपाठी यांच्या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद काल रात्रीच वाचून झाला. डॉ. मीना संभू-शेटे यांनी मराठी अनुवाद कसदार केला आहे.  पुस्तकातील तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष करुन आणि एक फिक्शन (कल्पनाविलास) म्हणून वाचले तर हे पुस्तक चित्तवेधक आहे. खिळवून ठेवण्याची क्षमता या कादंबरीत नक्कीच आहे. तसेच ही कादंबरी वाचकाला पुढील भाग वाचण्यास उद्युक्तही करते. आता पुढील मराठी भाग कधी प्रकाशित होतोय याकडे लक्ष आहे. कादंबरीत शिवाचे पात्र अतिशय सक्षमपणे रंगवलेले आहे. महादेव, रुद्र या विभिन्न व्यक्तीरेखांनंतर शिव हा महादेवाची जबाबदारी स्वीकारणारा श्रीरामानंतरच्या काळातला नायक आहे. महादेवाची जबाबदारी तो पेलू शकेल की नाही याबद्दल शिवाच्या मनातील आंदोलने अतिशय ताकदीने कादंबरीत उतरवलेली आहेत. मेलुहाच्या लोकांची जीवनपद्धती देखील वाचकाला प्रभावित करते. सतिचे पात्र अतिशय प्रभाव टाकते. तसेच कनखला, पार्वतेश्वर व आयुर्वती ही देखील या कादंबरीची लक्षात राहणारी ठळक पात्रे. दक्षाची भूमिका पटत नसली तरी त्याच...

शपथ वायुपुत्रांची - अमिश त्रिपाठी (अनुवाद : डॉ. मीना संभू-शेटे)

  पुस्तकाचे नाव : शपथ वायुपुत्रांची मूळ लेखक : अमिश त्रिपाठी मराठी अनुवादः मेघना संभू-शेट्ये पृष्ठसंख्या : ६८४ किंमत : रुपये ३९५ (पण ऑनलाईन मागवल्यास सवलतीत २१० ते २३० पर्यंत  मिळून जाते) शपथ वायुपुत्रांची कालच वाचून झाले. मला तरी शिवा ट्रिलॉजी आवडली. मूळ कथानक केंद्र स्थानी ठेवून मी वाचत असल्यामुळे आणि तांत्रिक, भाषिक, मुद्रण, अनुवाद अशा चुकांकडे दुर्लक्ष करु शकल्यामुळे कथानकाचा खूप मस्तपणे आनंद घेता आला. वायुपुत्रांची शपथ या तिसर्‍या आणि शेवटच्या भागाचा आत्मा दोन प्रमुख गोष्टींत आहे १. कथानकाची लयबद्धता आणि २. सती  या व्यतिरिक्त शिव, गणेश, कार्तिकेय, भगीरथ, भृगू, पाशुपतास्त्राची प्राप्ती, अज्ञात मारेकरी, मेलुहाचा सेनापति इत्यादी प्रमुख गोष्टी आहेतच. तरीही कथानकाचा आत्मा व्यापला आहे तो याच २ गोष्टींनी  सती चे पात्र प्रचंड ताकदीने या भागांत रंगवले गेले आहे. तसे ते सुरुवातीपासूनच होते. पण तिसर्‍या भागाच्या वाचनानंतर मनात काही उरत असेल तर ते शिव नसून सती. हे पात्र खूप ताकदीने रंगवले गेले आहे पण त्यामुळे शिवा ट्रिलॉजीच्या शेवटी शिव कमी उरतो. ...

"पार्टनर" - व.पु. काळे

  एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले. भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही. पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो. कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले. वैयक्तीक आयुष्यावर कदाचित अगणित कादंबर्‍या लिहिल्या गेल्या असतील.... वाचल्या गेल्या असतील... पण स्त्री-पुरुष , नवरा-बायको , आई - मुलगा, सासू - सून , भाऊ भाऊ, जिवाभावाचा मित्र, मालक-नोकर, विक्रेता-ग्राहक, दीर वहीनी या सर्व नात्यांवर कमी शब्दांत पण परिणामकारकपणे आणि विलक्षण प्रभावीपणाने क्वचितच कोणी लिहिले असावे. पहिल्याच सार्वजनिक भेटीत ज्या सौंदर्यवतीला पाहताच एका सामान्...