Skip to main content

मेलुहाचे मृत्युंजय - अमिश त्रिपाठी (अनुवाद : डॉ. मीना संभू-शेटे)

 


'मेलुहाचे मृत्युंजय'  हा 'द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा' या अमिश त्रिपाठी यांच्या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद काल रात्रीच वाचून झाला. डॉ. मीना संभू-शेटे यांनी मराठी अनुवाद कसदार केला आहे. 
पुस्तकातील तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष करुन आणि एक फिक्शन (कल्पनाविलास) म्हणून वाचले तर हे पुस्तक चित्तवेधक आहे. खिळवून ठेवण्याची क्षमता या कादंबरीत नक्कीच आहे. तसेच ही कादंबरी वाचकाला पुढील भाग वाचण्यास उद्युक्तही करते. आता पुढील मराठी भाग कधी प्रकाशित होतोय याकडे लक्ष आहे.
कादंबरीत शिवाचे पात्र अतिशय सक्षमपणे रंगवलेले आहे. महादेव, रुद्र या विभिन्न व्यक्तीरेखांनंतर शिव हा महादेवाची जबाबदारी स्वीकारणारा श्रीरामानंतरच्या काळातला नायक आहे. महादेवाची जबाबदारी तो पेलू शकेल की नाही याबद्दल शिवाच्या मनातील आंदोलने अतिशय ताकदीने कादंबरीत उतरवलेली आहेत. मेलुहाच्या लोकांची जीवनपद्धती देखील वाचकाला प्रभावित करते. सतिचे पात्र अतिशय प्रभाव टाकते. तसेच कनखला, पार्वतेश्वर व आयुर्वती ही देखील या कादंबरीची लक्षात राहणारी ठळक पात्रे. दक्षाची भूमिका पटत नसली तरी त्याची व्यक्तीरेखा फारसा प्रभाव सोडत नाही. मेलुहाचे लोक सूर्यवंशी व प्रभू श्रीरामाच्या आदर्श नियमांना काटेकोर पणे मानणारे असतात व त्यांचे चंद्रवंशी लोकांशी वितुष्ट असते. कादंबरीत दक्षकन्या सतिवर दोनवेळा हल्ला करणारी व अधून मधून वावरणारी बुरखाधारी नाग व्यक्ती कथानकात रहस्य व उत्कंठा निर्माण होण्यास बर्‍याच वेळा हातभार लावते. जिचा उलगडा कादंबरीच्या दुसर्‍या भागात 'द सिक्रेट ऑफ नागाज' यामध्ये होईल. कथानकाचा मूळ ढांचा चांगला असल्यामुळे पुस्तक एक थरारक वाचनानंद नक्की देते. पुस्तकाच्या सुरुवातीच्या १०० पानांत अनुवादिका चाचपडत आहे असे वाटते, पण नंतर मात्र अनुवादिकेने चुका कमी करत नेत योग्य ती पकड वाचकाला मिळवून दिली आहे. 

ही कादंबरी वाचणार असाल तर थोड्या सूचना :
१. पहिली शंभर-सव्वाशे पाने नेटाने वाचावी लागतील
२. तांत्रिक चुका वा आजच्या काळातल्या मीटर, हेक्टर यांसारख्या वापरलेल्या परिमाणांकडे दुर्लक्ष करा
३. अनुवादिकेने या कादंबरीचा अनुवाद करण्यासाठी बरेच परिश्रम केले आहेत पण सुरुवातीला तिच्या अनुवादांमधील किरकोळ चुकांकडे प्रयत्नपूर्वक काणाडोळा करा. पुढील दोन्ही भागांचे अनुवाद याच अनुवादिकेने केले तर ती जास्त योग्य न्याय देऊ शकेल असे वाटते.
४. चिकित्सक भूमिकेतून हवे तर वाचा पण एक फिक्शन म्हणून वाचले तर कादंबरी खरोखर वाचनानंद देते.

मेलुहाचे मृत्युंजय या कादंबरीविषयी मी वर जे लिहिले आहे ते अर्थातच माझे वैयक्तीक मत आहे. कोणाचा अनुभव वेगळा असेल तर माहिती करुन घ्यायला अवश्य आवडेल. 

Comments

Popular posts from this blog

"प्रे (सावज)" - मायकल क्रायटन (अनुवादकः प्रमोद जोगळेकर)

  पुस्तकाचे नावः प्रे (सावज) मूळ लेखकः मायकल क्रायटन अनुवादकः प्रमोद जोगळेकर प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत : रु. ३००/- मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये. जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्‍या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्‍यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच. पण त्याच्या जोडीला तो विज्ञान आणि निसर्गाचे नियम यांची अशी जबरदस्त तर्कशुद्ध जोड देतो की त्याच्या कादंबर्‍या या कल्पना वाटतच नाहीत. तर अगदी जवळच्या काळात हे सर्व वास्तवात येणार आहे असे वाचकाला मनोमन वाटून देण्यात तो कमालीचा यशस्वी झालेला आहे. थरारक कादंबर्‍यांमधून वाचकांचे सोप्या भाषेत ज्ञान संवर्धन करणे ही एक अत्भुत कला फार कमी लेखकांकडे असते. अशा हाडाच्या लेखकांपैकी मायकल क्रायटन आहे असे म्हटले तर ते योग्यच ठरेल. असो... लेखकपुराण पुरे करतो आणि आता आपण मायकल क्रायटनच्या "प्रे (सावज)" या कादंबरीकडे वळूयात. स...

...आणि पानिपत - संजय सोनवणी

  पुस्तकाचे नाव :  .... आणि पानिपत (कादंबरी) लेखक : संजय सोनवणी प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन, पुणे किंमत: ४०० रुपये पृष्ठसंख्या : ४७२ लेखकाचा ब्लॉग :  http://sanjaysonawani.blogspot.com/ पानिपताचे युद्ध आणि त्याची कारण मीमांसा यावर कित्येक कादंबर्‍या आणि संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत. अलिकडेच मी संजय सोनवणी यांची " ... आणि पानिपत " ही कादंबरी वाचली.  संजय सोनवणी हे संशोधन करुन पुराव्याच्या आधारे  लेखन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सदाशिवराव भाऊंचा तोतया , जनकोजी शिंदेचा तोतया याकडे ऐतिहासिक ग्रंथांनी जरी काणाडोळा केला तरी त्यांची स्फोटकता या कादंबरीत जाणवते. सन  १६८० ते १७६१ एका दलित कुटुंबियाच्या चार अख्ख्या पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला हा थरारक इतिहास काल्पनिक वाटतच नाही एवढा जळजळीत वास्तव वाटतो. भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला', किरण नगरकर यांची 'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या त्या काळात त्यांनी प्रचंड खळबळ उडविली होती. "...आणि पानिपत" ही देखील अशीच खळबळजनक कादंबरी आहे. "...आणि पानिपत " चे लेखक ...

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

  नमस्कार मित्रांनो, मी बरीच पुस्तके वाचली आहेत. "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही. मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच. नसेल तर अवश्य वाचा.लोकशाही कशी सरणावर जाते आणि हिटलरसारखे हुकुमशहा सत्तेवर कसे येतात याचा हा थरारक इतिहास आहे. मी काही हिटलरची भलावण नाही करत. पण त्याच्या काही गुणांना आपण मानलेच पाहिजे.शिवाय आपल्याला जो दुसर्‍या महायुद्धाचा जो इतिहास उपलब्ध आहे तो बराचसा जेत्यांनी लिहीलेला आहे.ही इतिहासाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती पहील्या महायुद्धात जर्मनीवर झालेल्या अत्याचारांची.कानिटकरांनी दुस-या महायुद्धाचा हा थरारक इतिहास लिहिताना याचे भान ठेवल्याचे जाणवते. दुसर्‍या महायुद्धाचे बीज पहील्या महायुद्धातच पेरले गेले होते.अशा परिस्थितीत हिटलर जन्मास आला नसता तर नवलच होते.फारसा मोठा लष्करी पर...