पुस्तकाचे नाव : हिरण्यदुर्ग. साहित्य प्रकार : अद्भुतरम्य कादंबरी. लेखक : संजय सोनवणी. मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी. प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे. पृष्ठं : ३५२ किंमत : ३५० रु. अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार तसा मराठी साहित्याला नवा नाहीये. पण दुर्दैवाने मराठी साहित्यात या कादंबरी प्रकारात फारसे काम लेखकांकडून झालेले नाही. मुळात कथानक गुंफण्याचं विलक्षण कसब असणारा लेखकच या अद्भुताच्या विश्वात प्रवेश करायला धजावतो. अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार मराठीत सुरु कसा झाला हा एक खरोखर उत्सुकतेचा विषय आहे. गो.ना. दातार यांनी रेनॉल्ड्स या पाश्चात्य लेखकाच्या कादंबर्यांची भारतीय रुपांतरे मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे व त्या कादंबर्या लोकप्रिय झाल्यावर अद्भुतरम्य कादंबर्या अनेक मराठी लेखक लिहू लागले. पण त्या सर्व कादंबर्यांचे सांगाडे विदेशी लेखकांचे असत. अगदी अलिकडे काही दशकांपूर्वी 'मर्मभेद'कार म्हणून गौरविले गेलेल्या शशी भागवतांच्या या कादंबरीतले अद्भुत ऐयार त्याच्याही आधी दोन दशकांपूर्वीच देवकीनंदन खत्रींच्या 'चंद्रकांता' या हिंदी कादंबरीत आ...